मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आणि जाईंट किलर ठरलेले शिरूरचे खासदार तसेच अभिनेते अमोल कोल्हे आज ‘कृष्णकुंज’वर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी ११.३० वाजता ही भेट होणार असल्याचे वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांनी दमदार कामगिरी केली होती.
डॉ. अमोल कोल्हे हे एनसीपीचे विद्यमान खासदार आहेत, तर राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष आहेत. दोघांचेही पक्ष वेगवेगळे असले तरी राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा राष्ट्रवादीला निश्चितच फायदा झाला आहे. तसेच लवकरच विधानसभा निवडणुका येणार असल्याने दोन्ही पक्षाकडून जवळीक साधण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय, दोघांनाही महाराष्ट्रात आपलं स्वंतंत्र असं वलय आहे. त्यामुळे या दोघांच्या भेटीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
