मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षात निवडून येणाऱ्या आणि समाजातील विविध घटकांशी जोडल्या गेलेल्या व्यक्तिमत्त्वांचा शोध सुरु आहे. दरम्यान मुंबई पोलीस दलातील धडाकेबाज अधिकारी प्रदीप शर्मा यांना स्वतःच्या पक्षात ओढण्यासाठी जवळपास सर्वच पक्षात जोरदार स्पर्धा लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पोलीस दलात कार्यरत असले तरी प्रदीप शर्मा यांच्या पी. एस. फाउंडेशनने मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रात मोठी समाज कार्य केली आहेत. अंधेरी पूर्वेतील गरजूंसाठी स्वस्त धान्य भंडार, शैक्षणिक मदत आणि स्वास्थ संबंधित मदत करून प्रदीप शर्मा यांची पी. एस. फाउंडेशन सामान्यांच्या परिचयाची झाली आहे.

दरम्यान, पी. एस. फाउंडेशन अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात सर्व धर्मियांसोबत जोडली गेल्याने, या मतदासंघात प्रदीप शर्मा यांचा समाज कार्याच्या आवाका देखील वाढला आहे. लवकरच याच मतदारसंघात नगरसेवक पदाच्या ३ वॉर्ड मध्ये पोटनिवडणूक होणार आहे, कारण येथील भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांचं सदस्यत्व जातपडताळणीत रद्द झालं आहे. त्यामुळे इथे पुन्हा होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत, एकूण तिन्ही मतदारसंघात प्रदीप शर्मा यांच्या पी. एस. फाऊंडेशनच्या समाज कार्याला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच २८८ मतदारसंघात तयार राहा असं वक्तव्य केला होतं नि युतीविषयी अनिश्चितता कायम ठेवली होती.

विशेष म्हणजे पी एस फाउंडेशनसोबत अंधेरी पूर्वेतील सर्वच पक्षातील पदाधिकारी सभासद म्हणून जोडले गेल्याने, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्या सारख्या समाजकार्यातून सामान्यांशी जोडल्या गेलेल्या आणि डॅशिंग अधिकारी म्हणून सर्वश्रुत असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी अनेकांनी जोरदार प्रयत्नं सूर केल्याचे वृत्त आहे. प्रदीप शर्मा यांना स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी भाजप देखील आग्रही असल्याचे समजते आणि स्वतः प्रदीप शर्मा यांचे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे समाज कार्य आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेले प्रदीप शर्मा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नक्की कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.

विधानसभा: धडाकेजबाज पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना स्वतःकडे खेचण्यासाठी सर्वच पक्षात चढाओढ