मुंबई: वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा काँग्रेस उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी पराभव केला आहे. झिशान हे ४,२८५ मतांनी विजयी झाले आहेत. झिशान काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना या मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली होती. वांद्रे पूर्वची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान या मतदारसंघात आहे.

शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून या मतदारसंघात अटी-तटीचा सामना सुरु होता. महाडेश्वर १५ वर्ष नगरसेवक आहेत. तृप्ती सावंत या गेली चार वर्ष स्थानिक शिवसैनिकांच्या संपर्कात नव्हत्या अशी चर्चा आहे. महाडेश्वर यांनी वांद्र पूर्वमधून निवडणूक लढवण्यासाठी आधीच तयारी सुरु केली होती.

विश्ननाथ महाडेश्वर हे मुंबई महापालिकेचे विद्यमान महापौर आहेत म्हणजे ते मुंबई प्रथम नागरिक आहे. मुंबईच्या प्रथम नागरिकांचा झालेला हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा प्रचंड मतांनी पराभव केला होता. परंतु, या निवडणुकीत शिवसेनेने तृप्ती सावंत यांचे तिकीट कापून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारीचे तिकीट दिले होते. त्यामुळे तृप्ती सावंत नाराज झाल्या होत्या. त्यांना अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करुन निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली होती. शिवसेना पक्षातच झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे.

मातोश्रीच्या अंगणातच काँग्रेसकडून शिवसेनेचा पराभव; महाडेश्वर पराभूत