मुंबई: राज्याचे २९ वे मुख्यंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, नेते दिवाकर रावते, डॉ. निलम गोऱ्हे यांनी त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी, “आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली आहे, आज फक्त शुभेच्छा देऊयात, कोणतंही इतर भाष्य नको” सांगत बोलणं टाळलं.

सहाव्या मजल्यावर जाण्याआधी उद्धव यांनी तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते सहाव्या मजल्यावर गेले. मुख्यमंत्री कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर उद्धव यांनी पदभार स्वीकारला. नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात व नितीन राऊत हे देखील त्यांच्या सोबत होते. सर्व मंत्री व आमदारांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला