7 July 2020 9:19 PM
अँप डाउनलोड

मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश असल्याचं त्यांचे आनंदी चेहरे सांगतात: सेनेची जहरी टीका

मुंबई: राष्ट्रपती राजवट लादली म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता परिवारातच राहिली. त्यामुळे मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश आहेत हे त्यांच्या आनंदी चेहऱ्यावरून दिसत आहे. आता सरकार कोणी व कसे बनवायचे? राष्ट्रपती राजवटीचा खेळखंडोबा लवकरात लवकर कसा दूर करायचा हाच प्रश्न आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

महाराष्ट्रानं आतापर्यंत कोणावरही मागून वार केले नाहीत. अफझल खानाचा कोथळाही समोरून काढला आहे. निखाऱ्याशी खेळू नकाच, पण कोळसा म्हणून हाती निखारा घ्याल तर चटकेही बसतील व तोंडही काळे करून घ्याल. आम्ही कोणत्याही संघर्षाला तयार आहोत, असं म्हणत शिवसेनेनं अप्रत्यक्षरित्या भाजपाला आव्हान दिलं आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या संपादकीय मधून राज्यातील एकंदरीत परिस्थितीवर टीका केली आहे. तसंच यावेळी राज्यात लावण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीवरूनही भाजपावर हल्लाबोल केला आहे.

पुढे काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात;

पण जणू कोणी तरी एखादी ‘अदृश्य शक्ती’ हा सर्व खेळ नियंत्रित करीत होती व त्याबरहुकूम सर्व निर्णय होत होते. देशाचे माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या परंपरेस हे शोभेसे नाही. राज्यपाल येतील आणि जातील, पण महाराष्ट्र तेथेच राहणार आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेच्या प्रक्रियेसाठी एक तर उशीर केला. त्यांनी जुन्या विधानसभेची मुदत पूर्णपणे संपू दिली. चोवीस तारखेस संपूर्ण निकाल लागले. राज्यपालांनी ही तत्परता व घटनेची आस्था पुढच्या ४८ तासांत दाखवायला काय हरकत होती? तसे झाले असते तर सत्तास्थापनेच्या अग्निपरीक्षेतून सर्वच दावेदारांना वेळ काढून जाता आले असते. तेवढे करूनही जर कोणाकडून त्यानंतर सत्ता स्थापन झाली नसती तर राज्यपालांच्या आजच्या कृतीस नैतिक बळ मिळाले असते. आज महाराष्ट्रात चार वेगवेगळ्या भूमिकांचे पक्ष आपापले पत्ते हाती घेऊन पिसत आहेत. या खेळात दुर्री, तिर्रीसही महत्त्व आले आहे.

राजभवनाच्या हाती ‘एक्का’ नसतानाही त्यांनी तो फेकला. जुगारात असे बनावट पत्ते फेकून डाव जिंकण्याचे प्रयत्न आतापर्यंत सफल झालेले नाहीत आणि महाराष्ट्र ही काही जुगारावर लावण्याची ‘चीज’ नाही. सरकारे येतील, सरकारे जातील; पण अन्याय आणि ढोंगाशी लढण्याची महाराष्ट्राची प्रेरणा अजिंक्य आहे. महाराष्ट्राने कधी कुणाच्या पाठीत वार केले नाहीत. अफझल खानाचा कोथळाही समोरून काढला आहे. निखाऱ्यावरून चालणारे आम्ही आहोत. हा निखारा म्हणजे विझलेला कोळसा नाही. निखाऱ्याशी खेळू नकाच, पण कोळसा म्हणून हाती निखारा घ्याल तर चटकेही बसतील व तोंडही काळे करून घ्याल. आम्ही कोणत्याही संघर्षाला तयार आहोत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(460)#Shivsena(887)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x