नवी दिल्ली : २०१४ मध्ये भारतात भाजपाची सत्ता स्थापन झाली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा पासून संपूर्ण देशाला केवळ तब्बल साडेचार वर्ष स्वतःच्या ‘मन की बात’ ऐकवणारे मोदी आता लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ‘भारत के मन की बात’ मोहीम सुरु करणार आहेत.
सध्या सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात सज्ज झाले असताना भाजपने सुद्धा कंबर कसली आहे. एका महिन्यासाठी असणाऱ्या या प्रचार मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. नरेंद्र मोदी चाणक्यपुरी येथील अशोक हॉटेलमध्ये या मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सुद्धा उपस्थित असणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी या योजनेमार्फत सर्वसामान्य भारतीयांचे मत आणि सल्ला विचारात घेणार आहे. एकूणच भाजप सध्या प्रचार रणनिती पाहता ते शासकीय योजनांच्या नावाने जाहिरातींवर जास्तीत सरकारी तिजोरीतील पैसा खर्च करून पक्षाचा प्रचार निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी उरकून घेताना दिसत आहे.
