बंगळुरु : संपूर्ण भारतभर घोडदौड सुरु असलेल्या भाजपच्या मोदीरथाची चाक कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत जमिनीत रुतण्याची चिन्हं दिसू लागली आहे. भाजपच्या काँग्रेसमुक्त भारताच्या स्वप्नात ‘भाजप मुक्त कर्नाटक’ इथूनच सुरुवात होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांना कर्नाटकातील तब्बल २२० मताधिपतींनी मोठा धक्का दिला आहे. केवळ एक दोन नव्हे तर तब्बल २२० मताधिपतींनी जाहीरपणे काँग्रेसला समर्थन देण्याची खुली घोषणा केली आहे. त्यामुळे कर्नाटक भाजपला चांगलाच घाम सुटला आहे.
अमित शहा यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यास नकार दिला होता. अखेर संतापलेल्या लिंगायत समाजाने भाजपच्या मोदीरथाला ब्रेक लावण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. अमित शहांच्या घोषणेला उत्तर म्हणून कर्नाटकातील २२० मठाधिपतींनी काँग्रेस पक्षाला खुलं समर्थन दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. त्यात अमित शहा यांनी ही मागणी फेटाळल्याने अखेर शनिवारी संतापलेल्या २२० मठांच्या मठाधिपतींनी अधिकृत बैठक बोलावून काँग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जर लिंगायत समाजाने मठाधिपतींच्या आदेशाचे पालन करत जर एकगट्ठा मतं काँग्रेसच्या पारड्यात टाकली तर भाजपच्या विजयरथाला कर्नाटकात ब्रेक लागण्याचीच अधिक शक्यता आहे.
शनिवारी बंगळुरू येथील बसव भवनामध्ये पार पडलेल्या एकूण २२० मठांचे मठाधिपती सहभागी झाले होते. त्यात चित्रादुर्गाचे प्रसिद्ध मुरुगा मठाचे मठाधिपती राजेंद्र स्वामी, बसव पीठाच्या प्रमुख माता महादेवी, सुत्तुर मठाचे मठाधिपतीं असे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी वीरशैव धर्मगुरुंच्या भेटी गाठी झाल्या होत्या. कर्नाटकातील लिंगायत समाजातील वीरशैव समाज हा काँग्रेसच्या निर्णयाचा कडाडून विरोध करत आहे.
