नवी दिल्ली : भाजपच्या गोटातून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पक्षाने प्रत्येक कार्यकर्त्याला २० घरांचं लक्ष्य आखून दिलं आहे. भाजपने आखून दिलेल्या या फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ते रहिवासी असलेल्या स्थानिक लोकांच्या २० घरांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने केलेली कामं त्यांच्यासोबत ‘चहाचा आस्वाद’ घेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहेत, असं लक्ष आखून देण्यात आलं आहे.

परंतु, भाजपने ही योजना अंमलात आणण्यापूर्वी त्यांच्या खासदार, आमदार तसेच बुथ लेवल कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी ‘घर-घर दस्तक’, हर बुध दस युथ, बुथ टोली हे कॅम्पेन सुद्धा मोठ्या प्रमाणावर चालवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्याबरोबरच नमो अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ आणि ग्राफिक्सचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. तसेच एका पोलिंग बुथशी किमान शंभर लोकांना जोडण्याचं लक्ष्य आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला हे नमो अँप इन्स्टॉल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

भाजपने कार्यकर्त्यांना प्रत्येकाच्या घरी जाऊन ‘चाय पे चर्चा’ करण्याचे लक्ष आखून दिलें असेल तरी महागाईने होरपळणाऱ्या सामान्य मतदार नक्की त्या कार्यकर्त्यांना चहा पाजेल का? असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. किंबहुना कार्यकर्ता सामान्यांच्या घरात जाऊन ‘चाय पे चर्चा’ करण्याचं धाडस करेल का असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समाज माध्यमांवरील भाजप विरोधी वातावरणाचा आढावा घेतल्यास ते दिलेलं लक्ष वास्तवात राबविणे कार्यकर्त्यांसाठी किती जोखमीचं कामं आहे, याचा अंदाज येईल.

BJP has set the mission for party workers for chai pe charcha for upcoming election 2019