मुंबई : भाजपचे विवादित आमदार राम कदम यांची मतदारसंघातील विकासाची कामं कोणती हे शोधायचे झाल्यास एखादं शोध पथक सुद्धा कमी पडेल. परंतु कोणत्याही कामाचे प्रोमोशन शोधायचे झाल्यास त्यांच्या मतदारसंघात जागोजागी असे डॅशिंग, दयावान आणि पुण्यवान नामकरणाचे बॅनर्स आणि होर्डिंग्स पाहायला मिळतील. त्यांच्या मतदारसंघातील भरीव अशा ४ पायऱ्यांच्या विकास कामाचा सध्या घाटकोपरमध्ये जोरदार प्रोमोशन सुरु आहे.
त्यांच्या मतदारसंघात दिसणारे हे होर्डिंग्स पाहून हसावे की रडावे अशी स्थिती पादचाऱ्यांची झाली आहे. एक पाऊलभर असणाऱ्या ४ पायऱ्या त्यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आल्या आहेत. परंतु त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी संबंधित एरियात इतकी पोश्टरबाजी केली आहे की जणू आमदार राम कदमांनी प्रचंड विकासाचं कार्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पोश्टरवर त्यांना दयावान आणि पुण्यवान आमदार अशा पदव्या बहाल केल्या आहेत.
आमदार राम कदमांच्या दहीहंडी दरम्यान महिलांबाबत केलेल्या विवादित वक्तव्यामुळे त्यांच्या खरा चेहरा जनतेसमोर आला होता. त्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात आली होती. राम कदम यांच्याकडून त्यांचं भाजप प्रवक्तेपद सुद्धा काढून घेण्यात आल्याचे वृत्त आहे. परंतु आगामी निवडणुकीसाठी त्यांची पोश्टरबाजी तेजीत आल्याचे दिसत आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		