मुंबई : शिवसेनेचे उपनेते तसेच वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी काल गुपचूप शिवसेनेचं शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला. कारण भाजपने आधी त्यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लावली आणि शिवसेनेपुढे संभ्रम ठेऊन त्यांना एकारात्रीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश दिला.
हाजी अराफात शेख यांची जेव्हा राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली तेव्हा सर्वांना वाटलं की ते शिवसेनेच्या कोट्यातील असावे आणि तशा प्रकारच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु त्यांनी राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेला अंधारात ठेवून भाजपबरोबर पडद्याआड बोलणी केल्या असाव्या असा कयास राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
परंतु आधी स्वतःची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून घेतली आणि हाती नियुक्तीपत्र येताच शिवसेनेचं शिवबंधन गुपचूप तोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे भाजप अशा प्रकारची रणनीती शिवसेनेच्या अजून काही नेते मंडळींसोबत अंमलात आणून, त्यांनी राजकीय धक्के देऊ शकते असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता आणि त्यानंतर शेख शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
