नवी दिल्ली : आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होऊन रुपयाने प्रति डॉलर ७१ रुपये असा निचांक दर गाठला. परंतु नंतर तो नऊ पैशांनी सावरून रुपयाचं मूल्य ७० रुपये ९१ पैशांवर स्थिरावलं आहे. या आर्थिक वर्षात रुपयाचं मूल्य तब्बल १० टक्क्यांनी घसरून आशियातील इतर चलनांच्या तुलनेत भारताच्या रुपयाची ही सर्वात वाईट परीस्थिती आहे. परंतु त्यामुळे २०१३ मधील सुषमा स्वराज यांच्या लोकसभेतील भाषणाची आठवण झाली आहे.
२९ ऑगस्ट २०१३ रोजी जेव्हा काँग्रेस सत्तेत होती आणि त्यावेळी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होताना दिसत होती. त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी लोकसभेत या विषयावर बोलताना काँग्रेस पक्षाचे आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या अर्थनीतीचे अक्षरशः वाभाडे काढले होते. सुषमा स्वराज यांनी भाषणादरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांची डिग्री सुद्धा काढली होती. अगदी भाषणादरम्यान बोलताना आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची १० पैशांनी होणारी घसरण पाहून सुषमा स्वराज यांना टीव्ही सुरु करताना सुद्धा भीती वाटायची, अशी माहिती त्यांनी लोकसभेत दिली होती. परंतु आज नेमकी कोणाची भीती वाटत असल्याने, त्या याच विषयावर मूग गिळून शांत बसल्या आहेत, असा प्रश्न राजकीय विश्लेषक विचारत आहेत.
परंतु त्या विरुद्ध आजची परिस्थिती अधिकच भयानक होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयानं प्रति डॉलर ७१ रुपये असा निचांक गाठला आहे आणि ही आशियातील इतर चलनांच्या तुलनेत भारताच्या रुपयाची सर्वात वाईट परीस्थिती आहे. परंतु रुपया महागल्यानं आयात, परदेशातील शिक्षण व परदेश प्रवास महाग होणार आहे. त्याचा सर्वात मोठा फटका पेट्रोल आणि डिझेलला बसणार आहे. भारतात तब्बल ८० टक्के कच्च्या तेलाची आयात करण्यात येते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि रुपयाच्या मोठ्या घसरणीमुळे तेल कंपन्यांना आणि सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. परिणामी, पेट्रोल तसेच डिझेलचे भाव कडाडण्याची दाट शक्यता आहे.
काय म्हटल्या होत्या सुषमा स्वराज २०१३ मध्ये रुपयाच्या घसरणीवर;
