सोलापूर : मराठा क्रांती मोर्चाच आंदोलन हळूहळू राज्यभर पेट घेण्याची चिन्ह आहेत. पंढरपूर नंतर आता सोलापुर शहरात मराठा समाजाने चक्काजाम आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या जमावाने दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली आहे.

मराठा समाजाचे आरक्षणासाठी सुरु झालेली पूर्वीची सर्व आंदोलन ही शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय मार्गाने पार पडली होती. परंतु सध्या मराठा क्रांती मोर्चाची आंदोलनं ही हिंसक वळणावर जाऊ लागल्याने राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सोलापुरात सुरु झालेल्या चक्काजामला हिंसक वळण लागताच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी काही आक्रमक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन सुरु केले. तेव्हा आक्रमक आंदोलनकर्त्यानी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि काही आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी २ एसटी बसेसची तोडफोड केल्याने, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या फोटोवर अंडी फेकल्याने या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही आक्रमक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणांनी कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

Maratha Kranti Morcha made chakkajaam at Solhapur during protest against state government