नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जीएसटी कौन्सिलने सॅनिटरी नॅपकिन्सच्या बाबतीत महत्वाचा निर्णय घेतल्याने समस्त स्त्री वर्गाला त्याचा फायदा होणार आहे. शालिनी ठाकरे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री मुनगंटीवार आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन या करमुक्तीची लेखी विनंती केली होती, ज्याला आज यश मिळालं आहे.

गरीब वर्गातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स स्वस्त दरात उपलब्ध करून द्यायचा असेल तर सॅनिटरी नॅपकिन्सला करमुक्तीच्या कक्षेत आणणे गरजेचे असल्याचे शालिनी ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या निदर्शनास आणले होते. त्यासाठी त्यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन लेखी पत्रव्यवहार सुद्धा केला होता. तसेच वैयक्तिक पातळीवर शालिनी ठाकरे यांनी पुढाकार घेऊन अनेक शाळांमध्ये मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे प्रयोग राबविले होते.

भारतासारख्या देशात आजही केवळ १२ टक्के स्त्रिया मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात आणि ८८ टक्के स्त्रिया जुने सुती कपडे किंवा अन्य साधनांचा वापर करतात. भारतात सुमारे ३५५ दशलक्ष स्त्रिया मासिक पाळी येणाऱ्या आहेत, पण यातल्या ७० टक्के स्त्रियांना सॅनिटरी नॅपकीन्स खरेदी करणं परवडत नाही. ग्रामीण स्त्रिया आजही सुती कापड किंवा झाडाची सुकलेली पानं किंवा इतर साधनांचा वापर करतात. तसेच परदेशी महागडे ब्रँड खूप महाग असल्याने ते गरीब स्त्रीवर्गाला आणि मुलींना परवडणार नसत. त्यामुळे या निर्णयामुळे तमाम स्त्री वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

आज दिल्लीत झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत २८ टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमधून अनेक वस्तूंना वगळण्यात आलं असून त्यात सॅनिटरी नॅपकिन्सचा समावेश आहे. त्यामुळे समस्त स्त्रीवर्गाला त्याचा फायदा होऊन सॅनिटरी नॅपकिन्स स्वस्तात उपलब्ध होणार आहेत.

Shalini Thackeray got one success because sanitary napkin will now totally tax free