मुंबई : प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे. त्यानंतर बरेच वादळ निर्माण झाले होते. साहित्यावर नितांत प्रेम करणारे राज ठाकरे यांच्या पक्षाकडून तशी मागणी झाल्याच्या बातम्या पुढे आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. परंतु, त्याबरोबर अनेकांनी वेगळीच शंका सुद्धा व्यक्त केली होती आणि ती म्हणजे मनसेच्या नावाने दुसरंच कोणी तरी हे करत आहे का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता.
एखाद्या पक्षाच्या शाखेकडून तशी मागणी झाल्याच्या बातम्या पेरण्यात येत होत्या. परंतु, एखाद्या पक्षाच्या स्थानिक शाखेच्या सांगण्यावरून आयोजक एवढा मोठा निर्णय कसा काय घेतील असा प्रश्न उपस्थित झाला आणि करविते धनी कोणी वेगळेच आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, आज स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची आणि स्वतःची भूमिका लेखी पत्राद्वारे प्रसिद्ध केली आहे.
९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात’ नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या वादंगाविषयी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ ने अधिकृत भूमिका मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटरवर पक्षाची अधिकृत भूमिका असलेलं एक पत्र पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.
‘९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात’ ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल ह्यांच्या उपस्थितीवरून सुरु असलेल्या वादंगाविषयी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची’ अधिकृत भूमिका. pic.twitter.com/MIvv2ZdO0t
— Raj Thackeray (@RajThackeray) January 7, 2019
