कोलकत्ता : पश्चिम बंगालमधल्या ठाकूर नगर येथील प्रचार रॅली दरम्यान मोदींचं भाषण सुरु होताच उपस्थितांनी प्रचंड गोंधळ आणि गदारोळ केल्याने पंतप्रधानांना त्यांचे भाषण केवळ १४ मिनिटातच आवरतं घ्यावं लागलं. सुरवातीला नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिले, परंतु काही वेळ बोलल्यानंतर प्रचंड गोंधळ आणि गदारोळ सुरु झाला. दरम्यान, पंतप्रधानांनी उपस्थित लोकांना माइकवरून आवाहन करत शांत रहाण्यास वारंवार सांगितले. परंतु, उपस्थित लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करत प्रचंड गोंधळ करण्यास सुरुवात केली. अखेर सर्वकाही नियंत्रणाबाहेर जाण्याच्या आधी मोदींनी केवळ १४ मिनिटात त्यांचे भाषण आटोपतं घेतलं.

उपस्थित प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका करण्यास सुरुवात करताच उपस्थित लोकांनी प्रचंड गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि रॅली असलेल्या ठिकाणी एकच गदारोळ सुरु झाला. पोलिसांनी सुद्धा ही गर्दी आवरण्याचा प्रयत्न केला परंतु, लोकांना नियंत्रित करणे आवाक्याबाहेर असल्याचे त्यांना सुद्धा ध्यानात आले.

दरम्यान, मोदींच्या भाषणादरम्यान झालेल्या गर्दीत अनेक उपस्थित लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या सर्व जखमींना तातडीने उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या मैदानाची जेवढी क्षमता आहे त्यापेक्षा अधिक प्रमाणात तुम्ही उपस्थित झालात यासाठी मी तुमचा आभारी आहे असे म्हणत मोदींनी त्यांचं भाषण संपवलं.

pm modis speech ended in just 14 minutes because of public chaos in thakur nagar rally at west bengal