मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आता खुद्द आरएसएस प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मैदानात उतरून घाटकोपरमध्येच आंदोलन करणार असल्याचे वृत्त आहे.
आज सध्यांकाळी घाटकोपर स्टेशनला हे आंदोलन होणार असल्याचे वृत्त आहे. विरोधकांसोबत आता भाजपशी संबंधित विद्यार्थी संघटनाच राम कदम यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरणार असल्याने ते अजून अडचणीत येण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद थेट घाटकोपरमध्येच राम कदमांविरुद्ध जुते मारो आंदोलन करणार आहे.
दहीहंडी उत्सवादरम्यान बोलताना राम कदमांच्या जिभेवरील ताबा घसरला आणि उपस्थित तरुणांना उद्देशून म्हणाले होते की, ‘एखाद्या मुलीला तुम्ही प्रपोज केले आणि तिने तुम्हाला नकार दिला. तर त्या मुलाने आपल्या आई वडिलांना आणावे, आई वडिलांनी जर सांगितले की आम्हाला मुलगी पसंत आहे तर मुलीला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. १०० टक्के मी मदत करेन हा शब्द देतो’ असं बेताल वक्तव्य केलं होत.
त्यानंतर मात्र त्यांच्यावर सर्वच थरातून तुफान टीका करण्यात येत आहे. अनेक पक्ष तसेच समाजसेवी संघटनांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला होता. अनेक वृत्त वाहिन्यांनीसुद्धा त्यांना चांगलेच धारेवर धरले असले तरी ते जाहीर माफी न मागता केवळ वरवरची दिलगिरी व्यक्त करून वेळ मारून घेतली.
