औरंगाबाद : मराठा आरक्षण तापू लागल्याने अनेक राजकारणी नवं नवे प्रयोग करताना दिसतील आणि त्यातले काही जण असे प्रयोग अनेक वेळा करून झाले आहेत आणि शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव त्यातीलच एक असच म्हणावं लागेल. भावनिक राजकारण आणि संधीचा फायदा असच त्या मागील कारण असावं असं राजकीय विश्लेषक मत व्यक्त करत आहेत.

वास्तविक मराठा आरक्षणाच्या नव्या पर्वाबद्दल बोलायचे झाल्यास हे आंदोलन पेटण्यास सुरुवात झाली ती मराठवाड्यातून आणि विशेषकरून औरंगाबादमधून. शिवसेनेचे आमदार असलेले हर्षवर्धन जाधव हे मराठवाड्यातील कन्नड मतदारसंघातील आमदार आहेत. विशेष म्हणजे आमदार हर्षवर्धन जाधव आणि शिवसेनेचे औरंगाबादमधील खासदार चंद्रकांत खैरे यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. त्यात कालच औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार चंद्रकांत खैरेंना धक्काबुकी करून त्यांना शिवीगाळ करत हाकलून दिले होते. त्याचाही संदर्भ या राजीनामा नाट्याशी जोडला जात आहे.

त्यात आज मराठा आरक्षणासाठी राजीनामास्त्र उगारण्यात आले असून शिवसेनेचे कन्नड मतदारसंघातील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना ई-मेलद्वारे पाठवला आहे. विशेष म्हणजे असे राजीनामा प्रयोग त्यांनी अनेक वेळा केले आहेत.  राजीनाम्याची कारण वेगळी असली तरी त्यांनी डिसेंबर २०१५ मध्ये पत्राद्वारे आणि ऑक्टोबर २०१५ मध्ये फॅक्सद्वारे राजीनामा देण्याचे प्रयोग केले आहेत जे कधी सत्यात उतरलेच नाहीत. विशेष म्हणजे शिवसेना आमदार असलेले हर्षवर्धन जाधव हे भाजप खासदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. त्यामुळे त्यांची काही वेगळीच राजकीय गणित असू शकतात असं स्थानिक राजकीय विश्लेषक बोलत आहेत. त्यामुळे या राजीनाम्याला प्रसार माध्यमं सुद्धा गांभीर्याने घेताना दिसत नाहीत.

Sena Kannad MLA has resign again third time