मुंबई: BEST कामगारांचा संप न मिटल्यानं मुंबईकरांच्या समस्या संपण्याचं नाव घेत नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सलग ७वा दिवस आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीबरोबर चर्चा केल्यानंतर सुद्धा लेखी आश्वासन मिळेपर्यंत BEST कामगार संघटना अजून माघार घेण्यास तयार नाहीत.
आज मुंबई हायकोर्टात संपासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी असल्यानं त्याआधी महाराष्ट्र सरकार काही निर्णय घेतं का त्याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे. दरम्यान, बेस्ट कामगार कृती समिती, बेस्ट प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीची दुसरी फेरी सुद्धा सोमवारी होण्याची शक्यता आहे.
याआधी बेस्ट कामगारांच्या संघटनांनी आणि कुटुंबीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन अडचणींचा पाढा त्यांच्याकडे मांडला होता. त्यामुळे आज स्वतः राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सदर विषयाला अनुसरून बैठक घेणार आहेत. त्यामुळे यातून काही पर्याय निष्पन्न होणार का आणि मुंबईकर तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का ते पाहावं लागणार आहे.
