
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीला मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. आता लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म CLSA ने लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिवसअखेर लार्सन अँड टुब्रो स्टॉक 2.35 टक्के वाढीसह 3097.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो स्टॉक 0.034 टक्के घसरणीसह 3,095.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 2500-5000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला या ऑर्डर अंतर्गत बंगळुरू शहरात निवासी टाउनशिप बनवण्याचे काम देण्यात आले आहे. या ऑर्डर अंतर्गत लार्सन अँड टुब्रो कंपनीला 19 टॉवर्समध्ये 3627 अपार्टमेंट बनवण्याचे काम करायचे आहे. यामध्ये 3 बेसमेंट, ग्राउंड आणि 23-31 मजले, 88 व्हिला आणि क्लब हाऊस, स्विमिंग पूलचे बांधकाम करायचे आहे.
याशिवाय कंपनीला हैदराबाद शहरात व्यावसायिक टॉवर बांधण्याचे काम देण्यात आले आहे. यामध्ये लार्सन अँड टुब्रो कंपनी 42 लाख स्क्वेअर फूट जमिनीवर दोन इमारत बांधणार आहे. यामध्ये एका इमारतीत 2 तळघर, ग्राउंड, 15 मजले, आणि दुसऱ्या इमारतीमध्ये 3 तळघर, लोअर ग्राउंड, अप्पर ग्राउंड, 14 मजले बांधायचे आहे.
लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या पॉवर बिझनेस युनिटला देखील मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत. 4 ऑक्टोबर 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, त्यांच्या पॉवर सेक्टर युनिटला पश्चिम बंगाल राज्यात पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून 2500 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. स्टॉक मार्केट नियामक फाइलिंगनुसार, बंगाल राज्यात सागरदिघी येथे थर्मल पॉवर प्लांटमध्ये वेट फ्ल्यू गॅस डिसल्फुरायझेशन सिस्टीम तयार करण्याचे काम देण्यात आले आहे.
परकीय ब्रोकिंग फर्म CLSA ने लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 3,600 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मागील सात दिवसांत लार्सन अँड टुब्रो कंपनीला मुंबई इन्फ्रासाठी 150 कोटी डॉलर्स मूल्याचे काम मिळाले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातील व्यावसायिक उद्दिष्टापैकी निम्मे उद्दिष्ट कंपनीने पहिल्या सहामाहीत साध्य केले आहेत.
लार्सन अँड टुब्रो कंपनीला IIT कानपूर कडून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि गंगवाल स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीचा एक भाग तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत लार्सन अँड टुब्रो कंपनीला 500 खाटांचे हॉस्पिटल ब्लॉक, ज्यामध्ये ग्राउंड आणि 5 मजले बांधण्याचे काम देण्यात आले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.