मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकावर एक राजकीय धक्के बसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या माजी आणि विद्यमान आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा सपाटा लावला होता, तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेत प्रवेशाचा सपाटा लावला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात प्रतिनिधी म्हणून धाडण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईतील वरळी किंवा शिवडी या दोन विधानसभा मतदारसंघापैकी एकाची निवड करण्याची दाट शक्यता आहे.

त्या अनुषंगाने शिवडी येथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार बाळा नांदगावकर विधानसभा लढवणार असल्याने शिवसेना कोणताही धोका पत्करणार नाही अशी शक्यता आहे. दरम्यान बाजूच्या वरळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि माजी आमदार सचिन अहिर यांचा मोठा दबदबा असून कार्यकर्त्यांचे जाळे देखील आहे. त्यामुळे येथून सचिन अहिर यांनाच पक्षात आणून वरळी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीचं मैदान आदित्य ठाकरे यांच्यासाठी पोषक करण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मिशन आदित्य’साठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शक्ती पणाला लावल्याचे समजते.

त्यानिमित्ताने आज राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष आणि माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक आणि अमरावती आमदार देखील शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद घेणार आहेत. यात ते सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करतील, असे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई एनसीपीचे बडे नेते सचिन अहिर घड्याळाची साथ सोडत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने एनसीपीला मोठा धक्का बसल्याचे म्हंटल जात आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘काही लोकांना आमदार न झाल्यास राजकारणच करता येत नाही, त्यामुळे ते असा निर्णय घेतात,’ असे म्हणत एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिन अहिर यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदही बोलवली आहे. त्यामुळे सचिन अहिर दुपारीच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने दिवसेंदिवस भारतीय जनता पक्ष – शिवसेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस – एनसीपी कमकुवत होताना दिसत आहे.

काहींना आमदार न झाल्यास राजकारणच करता येत नाही; त्यामुळे असे निर्णय घेतात: अजित पवार