मुंबई: शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीनं माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. निवडणूक प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर असेल, त्यामुळं मी स्वतः २७ सप्टेंबरला मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर होईल. त्यांचा पाहुणचार स्वीकारण्याची तयारी आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं.

शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये मी स्वतः जाणार आहे. तिथे जाऊन ईडीचा ‘पाहुणचार’ स्वीकारणार आहे असाही टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना माझ्याबाबत जी माहिती हवी असेल ती देईन असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मंगळवारी संध्याकाळी ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भातच शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर माझा पू्र्ण विश्वास आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

मी राज्य सहकारी बँकेचा कधीही संचालक वा सदस्य कधीच नव्हतो असेही त्यांनी सांगितले. मी महिनाभर राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार आहे, त्यामुळे ईडीला माझी गरज लागली तर नी एकदम अदृष्य झालो असं वाटू नये म्हणून मीच ईडीच्या मुंबईतील कार्यालयात दाखल होणार असल्याचे पवारांनी सांगितले.

राज्य मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणांत तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ‘नाबार्ड’च्या अहवालात आहे. ‘नाबार्ड’ने दिलेल्या अहवालाच्या आधारे समाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुंबईत रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात २६ ऑगस्ट अजित पवार यांच्यासह ७० नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर, या प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तपास सुरू असतानाच ईडीने मंगळवारी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दिल्लीच्या तख्तापुढं झुकणं आम्हाला माहित नाही’, ‘ईडी’चा पाहुणचार स्वीकारणार