मुंबईः युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काल वरळी मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. देशात आणि महाराष्ट्रात मराठी हक्कासाठी लढणारा पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेकडून वरळीत “केम छो वरली” असे लिहिलेले बॅनर झळकले आहेत.या बॅनरवर आदित्य ठाकरे यांची छबी असल्याने विरोधकांना निवडणुकीच्या तोंडावर आयते कोलीत मिळाले आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी मतदार संघातून शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणाऱ्या पहिला व्यक्तीचा मान आदित्य ठाकरे यांना मिळाला आहे. शिवसेनेची प्रतिमा मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष अशी आहे.मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून वरळीमध्ये ‘केम छो वरली’ अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीवरून समाज माध्यमात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वरळीतील उच्चभ्रू गुजराती मतं मिळवण्यासाठी व गुजराती समाजाला आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली असल्याची चर्चा आहे.

अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवरुन शिवसेनेच्या गुजराती पोस्टरचा समाचार घेतला आहे. शिवसेनेचा वाघ आता ढोकळा खायला लागला अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असे बिरुद मिरवणारा पक्ष आता केम छो वरली म्हणतोय वा रे राजकारण असेही एका नेटकऱ्याने म्हटले आहे. दादा काय झालं मराठीचा विसर पडला का? असे एका नेटकऱ्याने विचारले आहे

आदित्य ठाकरेंच्या गुजराती बॅनरवरुन सोशल मीडियानं शिवसेनेला धारेवर धरलं आहे. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न आहे. उद्योगधंदे गुजरातला नेले जात आहेत, अशी टीका शिवसेनेनं अनेकदा केली आहे. त्याच टीकेची आठवण सोशल मीडियावर अनेकांनी करुन दिली आहे. हाच का शिवसेनेचा मराठी बाणा, असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. मराठी मराठी करणाऱ्या शिवसेनेला आता त्याच मराठीचा सोयीस्कर विसर पडल्याची टीकाही अनेकांनी केली आहे.

आदित्य यांचं ‘केम छो वरली’; मराठी माणूस म्हणतो इथेच आपला ‘गेम छो मुंबई’: सविस्तर