बीड: विधानसभा निवडणुकीत राज्यात अनेक धक्कादायक निकाल समोर आले. परळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करत राज्याचं लक्ष वेधून घेतलं. परळीतील या धक्कादायक निकालानंतर सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

‘हा पराभव ‘पंकजा गोपीनाथ मुंडेंचा’ आहे, कारण तो हवा होता अनेकांना म्हणूनच झाला असावा. खूप काही जिल्ह्यासाठी स्वप्न होती ती राहिली सल एवढीच आहे. चला मग रजा घेते,सामाजिक कर्तव्यातून नाही पण पराभूत लोकप्रतिनिधी म्हणून,’ असं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पोस्टमध्ये पंकजा लिहितात;

मी माझा पराभव मान्य केला असून मी लागलीच माध्यमातूनही त्याचा स्वीकार केला आहे. असं सर्व का झालं यावर मी चिंतन करेन लोकांना जाऊन भेटेन. आता या विषयाला सर्वांनी विराम द्यावा. कोणी कोणावर आरोप करू नये, जबाबदारी ढकलू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबासमवेत साजरी करावी. राजकारणात सर्वेसर्वा असतात मतदार, त्यांचा निर्णय अंतिम असतो. तो योग्य का अयोग्य यात चर्चा नसतेच, तो अंतिम असतो बस्स!! ज्यांनी मतदान केलेलं असतं त्या लोकांसाठी तो निर्णय योग्यच असतो!! मी माझ्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत स्पष्ट केलं होतं “मला मुक्त करा किंवा स्वतः मुक्त व्हा.” या राजकारणात मी यशस्वी होणं हा ही पराभव आहे, असंही मला वाटत राहिलं.

बीडमध्ये झालेल्या पराभवावर पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट