उस्मानाबाद: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजच्या दुसऱ्या दिवशी वादाचे गालबोट लागले. संत साहित्य आणि बुवाबाजी या विषयावरील परिसंवादात हा वाद उफाळून आला. संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
परिसंवाद होण्याआधी काही तरुण संमेलनास्थळी आले. त्यांनी संतसाहित्यामुळे बुवाबाजीचं प्रस्थ वाढत आहे असं म्हटलं. तसेच त्यांना त्यांचं मत मांडू देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी आयोजकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक मंचावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आयोजकांनी त्यांना त्यांचं जे म्हणणं आहे ते लिखित स्वरुपात देण्यास सांगितलं. मात्र, त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे साहित्य संमेलनात काहीवेळ गोंधळ झाला. काहीवेळाने हे तरुण गोंधळ घालून निघून गेले. पोलिसांकडून या तरुणांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
हा परिसंवाद सुरू होत असताना लातूर येथील जगन्नाथ पाटील व्यासपीठावर आले आणि मलाही काहीतरी सांगायचे आहे, असे म्हणत ध्वनीक्षेपकाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. साहजिकच त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली गेली आणि त्यामुळे वादाला सुरुवात झाली. रीतसर परवानगी शिवाय बोलता येणार नसल्याचे संयोजकांनी सांगितले. तरीही त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला आणि वाद वाढत गेला. दोन्ही बाजूंच्या लोकांना पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पाटील यांना व्यासपीठावरून खाली आणत असताना वाद वाढत गेला.
दरम्यान, खाजगी सुरक्षारक्षक बोलावून संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दमदाटी केल्याचा आरोप पाटील यांनी केला. व्यासपीठावर मान्यवर आणि महिला प्रतिनिधी उपस्थित आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही सुरक्षा व्यवस्था आहे, असे संयोजन समितीने स्पष्ट केले. पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या हातात वादग्रस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वृत्तपत्राचे अंक होते. या व्यक्ती कोणत्या संघटनेशी निगडित आहेत असे विचारले असता दिब्रिटो यांना विरोध करणाऱ्या गटाचे हे लोक आहेत असे संयोजन समितीचे पदाधिकारी अग्निवेश शिंदे यांनी सांगितले.
Web Title: Dispute in Marathi Sahitya Sammelan Parisamvad at Osmanabad.
