नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्यावरून संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी सुरूवीतीपासूनच विरोधाचा सुर आळवला आहे. एवढेच नाहीतर त्यांनी ट्विटकरून सीएए व एनआरसीविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे जाहीर अभिनंदन देखील केले आहे. आता प्रशांत किशोर यांची कंपनी दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीची रणनीती बनवण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे त्यांचा पक्ष संयुक्त जनता दल दिल्लीतील निवडणुकीत भारतीय जनता पक्षा’बरोबर आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्याच पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यात शाब्दीक युद्ध रंगल्याचे दिसत आहे. नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधत, जे पक्ष सोडून जाऊ इच्छित आहेत त्यांनी जावे, असे म्हटले आहे. तर नितीश कुमार यांच्या या विधानावर प्रशांत किशोर यांनी देखील प्रतिक्रिया दिली, नितीश कुमार यांना जे म्हणायचे होते ते त्यांनी म्हटले आहे. तुम्हाला माझ्या उत्तराची प्रतिक्षा करावी लागेल, मी बिहारमध्ये येऊन याचे उत्तर देणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

सध्या प्रशांत किशोर यांच्या एकूण राजकारणाचा आढावा घेतल्यास ते मिशन २०२४ साठी जोरदार कामाला लागले आहेत असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं आणि त्याअनुषंगाने बिहार आणि उत्तर प्रदेशात मोठी राजकीय रणनीती आखात असल्याचं समजतं. प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांचा दावा खोटा असल्याचं सांगत जोरदार प्रतिउउतर दिलं आहे. ‘मी जदयूत कसा प्रवेश केला याबाबत नितीश कुमार यांनी खोटे सांगितले आहे. ते ज्या रंगात रंगले आहेत त्याच रंगात मलाही रंगवायचा हा खूपच वाईट प्रयत्न होता. जर तुम्ही खरंच सांगत असाल तर कोण यावर विश्वास ठेवेल की अमित शहा यांनी सुचवलेल्या व्यक्तीचे तुम्ही ऐकत नाही’, असे ट्विट प्रशांत किशोर यांनी केले आहे. दरम्यान, प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांच्यातील वाद विकोपाला गेला असून प्रशांत किशोर जेडीयूला राम राम ठोकून पक्षात फूट पडतील किंवा थेट कॉग्रेसमध्ये प्रवेश करून बिहार आणि उत्तर प्रदेशात ब्रँड प्रियांका मोठं करण्याची जवाबदारी स्वीकारतील असं चित्र आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील मागील विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करा असा सल्ला प्रशांत किशोर यांच्या I-PAC या निवडणुकीच्या प्रचाराचं कामं पाहणाऱ्या कंपनीने दिला होता. मात्र तुम्ही केवळ व्यावसायिक गोष्टींकडे लक्ष द्या आणि आम्हाला राजकारण शिकवू नका असा सल्ला अतिशहाण्या काँग्रेसच्या नेत्यांनी प्रशांत किशोर यांना दिला आणि त्यानंतर भाजप बहुमताने सत्तेत आलं आणि योगी मुख्यमंत्री झाले. त्यात आता राहुल गांधी स्वतः यूपीतून पराभूत झाले आहेत आणि प्रयांका याच उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला हव्या हा प्रशांत किशोर यांचा जुना सल्ला त्यांना कालांतराने पटला आहे असं वृत्त आहे. त्यात प्रशांत किशोर यांनी ज्या पक्षांसाठी काम केलं त्यात शिवसेना, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्याशी चांगले राजकीय संबंध जपले आहेत. त्यामुळे ते देखील २०२४ मध्ये महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपविरोधी भविष्यकाळातील म्हणजे २०२४ मधील रणनीती स्वतः प्रशांत किशोर राबवत आहेत असंच म्हटलं जातं आहे.

 

Web Title:  Prashant Kishor mission 2024 in Bihar and Uttar Pradesh state.

बिहार जेडीयू’त फूट आणि यूपीत ब्रँड ‘प्रियांका’; रणनीतिकाराचं मिशन २०२४? – सविस्तर वृत्त