नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज जेईई आणि नीट परीक्षासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. नीट व जेईई परीक्षा आता वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार आहे. तशी अधिकृत घोषणा आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिल्लीतील आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
नेट आणि जेईई मेन’ची परीक्षा दरवर्षी अनुक्रमे जानेवारी व एप्रिल महिन्यात घेण्यात येतील. तसेच ‘नीट’ परीक्षा फेब्रुवारी व मे महिन्यात घेण्यात येतील. याआधी या परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येत होत्या आणि कमी गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागत असल्याने वेळ सुद्धा वाया जायचा. परंतु नव्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नीट व जेईई परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत पार पाडल्या जाणार आहेत. तत्पूर्वी या परीक्षा सीबीएसईमार्फत घेतल्या जात होत्या. या परीक्षासंदर्भातील नवीन नियम शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार असल्याचे सुद्धा केंद्र सरकारने स्पष्ट केलं असून, या परीक्षा कॉम्प्यूटरवर घेतल्या जाणार आहेत.
