पुणे : आगामी निवडणुकीत सोशल मीडिया महत्वाची भूमिका बजावणार असल्याने भाजपच्या आयटी-सेल योद्ध्यांनी विरोधकांना जोरदार उत्तर देण्यासाठी कंबर कसली पाहिजे असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केला आहे. तसेच शेतकरी आत्महत्यांवर बोलणाऱ्या शरद पवारांना सुद्धा सोशल मीडियातून चोख प्रत्युत्तर द्यावे असे आदेश अमित शहा यांनी त्यांच्या टीमला दिले आहेत.
दरम्यान काँग्रेसवर टीका करताना अमित शहा म्हणाले की,’ मागील ७० वर्षातील कचरा ४ वर्षात संपणार का?’ असा प्रतिसवाल करत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सुद्धा समाज माध्यमांमधून जोरदार उत्तर देण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. पुणे येथे भाजपच्या प्रदेश सोशल मीडियाच्या टीमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहा यांनी त्यांच्या प्रतिनिधींना संबोधित केले तेव्हा त्यांनी या आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपने समाज माध्यमांच्या तसेच शेतकरी, दलित, आदिवासी यांच्या साथीने सत्ता मिळविली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सुद्धा सोशल मीडिया खूप महत्वाची भूमिका पार पडणार असल्याचे त्यांनी सूतोवाच केलं आहे. त्यामुळे आपल्या सायबर सेनेने उपलब्ध असलेला विविध माहितीचा खजिना योग्य रित्या वापरून तो समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला पाहिजे असं त्यांनी कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितलं.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		