मुंबई : तसा दोष त्या गोंडस बाळाचा नाही किंवा त्याच्या आई-वडिलांचा, कारण प्रसार माध्यमांमधील जवाबदारीच हळहळू संपुष्टात येते आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण होते आहे. सिनेश्रुष्टी आणि करमणूक क्षेत्रातील बातम्या हा देखील प्रसार माध्यमांतील घटक आहे हे खरं असलं, तरी सुद्धा एखादा विचारात न घेण्यायोग्य मुद्याला राष्ट्रीय स्तरावरील दैनंदिन बातमी बनविणे हे कितपत योग्य आहे, हा सुद्धा प्रश्न येतो.
‘तैमूर ने काय खाल्लं’ ‘तैमूर दुडूदुडू धावला’ ‘तैमूर असा हसला’ ‘तैमूरचा डायपर कोण बदलतं?’ ‘तैमूर या बेबी सिटिंग’मध्ये दाखल’ अशा बातम्या म्हणजे प्रसार माध्यमांच्या मुख्य बातम्या झाल्या आहेत. त्यात नेटकरी तैमूरच्या बातम्यांवर इतके झोडपून काढतात, तरी वाचकाला या बातमीत अजिबात रस नाही हे दिसत असताना सुद्धा प्रसार माध्यमं या बातम्या जाणीवपूर्वक प्रसारित करतात. तैमूर या विषयाला माध्यमांनी इतका मोठा राष्ट्रीय मुद्दा बनवला आहे की, त्याच्या जन्मदात्या पित्याने सुद्धा तैमूर ट्रेडमार्क रजिस्टर्ड करावा का? असा प्रश्न उपस्थित केला होता. आता तर हुबेहूब तैमूर’सारखी दिसणारी बेबी-बॉय डॉल सुद्धा बाजारात आली आहे. त्यावरून त्याला किती प्रसिद्धी दिली गेली आहे, याचा अंदाज येतो.
सगळेच नाही पण आज अनेक प्रसार माध्यमं सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली गेली आहेत. त्यामुळे सामान्यांना महत्वाच्या आणि गंभीर विषयांपासून दूर लोटण्यासाठी अशा विषयांना अति महत्वाचं करण्यात येते. त्यामुळे स्वतःच्या पोर्टलवरील ग्राहकाच्या प्रोग्रॅमॅटीक ‘पे पर क्लीक’ आणि ‘इंप्रेशन जाहिरातींचा’ जास्तीत जास्त ऑनलाईन खप करण्यासाठी व्यावसायिक हेतूने अशा बातम्या अति महत्वाच्या करण्यात येतात. त्यामागील मूळ उद्देश हा व्यावसायिक असतो जो वाचकाला ज्ञात नसतो. अगदीच काही नाही झालं तर नकारात्मक मार्केटिंग सुद्धा कामी येते. परंतु, हा व्यावसायिक उद्देश खऱ्या आणि प्रामाणिक बातम्या देऊन सुद्धा साध्य करता येतो, याची काही प्रसार माध्यमांना जाणीव नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे काही ठराविक डिजिटल न्युज पोर्टल्स मूळ प्रसार माध्यमांच्या मागून येऊन, वेगाने मोठ्या झाल्या आणि त्याचं मूळ कारण हेच होतं, की त्यांनी वाचकापुढे राजकारणाचं, सत्ताधाऱ्यांचं आणि समाजातील वास्तव मांडलं जे वाचकाच्या सुद्धा पचनी पडलं.
आज शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, सत्ताधाऱ्यांचे घोटाळे, बेरोजगारी, सरकारच्या फसव्या योजना, भारतीय लष्कराच्या जवानांचे प्रश्न असे एक ना अनेक गंभीर विषय समोर असताना सुद्धा ‘तैमूर’च्या डायपरमध्ये घडणाऱ्या घडामोडी हा राष्ट्रीय मुद्दा केला जातो, हे अत्यंत भीषण आहे. एखाद्या गंभीर विषयावर एखादी वरचे वर बातमी दाखवून, त्या बातमीच्या खोलवर जाण्याचा आणि लोकांसमोर वास्तव मांडण्याचा प्रयत्नं होताना दिसत नाही. त्यामुळे प्रसार माध्यमांवरील विश्वासार्हता दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे आणि हे भविष्याचा विचार करता अतिशय भीषण आहे.
