मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलू लागले आहेत तर नरेंद्र मोदी गप्प झाले आहेत. सध्या नरेंद्र मोदी यांचा मनमोहन झाल्याचा हा पुरावा आहे अशी बोचरी टीका करण्यात आली आहे.
मोदींना बोलते करण्यासाठी एकतर भारताची राजधानी दिल्लीतून लंडनला हलवा नाहीतर दिल्लीत परदेशी देखाव्यांचा सेट उभारा अशी उपहासात्मक टीका पंतप्रधानांवर उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नरेंद्र मोदी हे हिंदुस्तानात असले की ‘मौनी बाबा’ असतात, पण परदेशात गेले की ते बोलके होतात. भारतात घडणाऱ्या घटनांचा मोदींना उबग येतो. मग विदेशात जातात आणि स्वदेशातील घटनांवर बोलतात अशी खरमरीत टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.
दैनिक सामानातून अग्रलेखात उद्धव ठाकरे म्हणतात की, भारतात घडणाऱ्या घटनांवर नरेंद्र मोदींना व्यक्त झालेलं पाहायचं असेल तर हिंदुस्थानची राजधानी न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस, टोकियो किंव्हा जर्मनी येथे हलवावी लागेल. तरी ते शक्य नसेल तर दिल्लीचे रूपांतर हे सिनेमातील भव्य सेटप्रमाणे परदेशातील शहरात करावे लागेल,’ अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
