नवी दिल्ली: संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि हरयाणा दोन्ही विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ ऑक्टोबर (गुरूवार) रोजी जाहीर होणार असून दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात १.८ लाख इव्हिएमचा वापर होणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण ८.९४ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीत पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच उमेदवारांना आपल्या गुन्हेगारीची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. २८ लाखांपेक्षा अधिक खर्च करण्याची परवानगी नाही.

निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख – २७ सप्टेंबर

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – ४ ऑक्टोबर

अर्जांची छाननी – ५ ऑक्टोबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत – ७ ऑक्टोबर

मतदान – २१ ऑक्टोबर

मतमोजणी – २४ ऑक्टोबर

निवडणुकांच बिगुल वाजलं, महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला निकाल