मुंबई: देवेंद्र फडणवीस यांचं सरकार २ दिवसताच कोसळलं आणि समर्थन देणारे इतर छोटे पक्ष महाविकासआघाडीकडे समर्थनार्थ धाव घेऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या समर्थक अपक्ष आमदारांनी आणि राज्यातील छोटे पक्ष असणाऱ्या सहकारी पक्षांनी एकत्र येत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपाला समर्थन जाहीर केलं होतं.

त्यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वसई, नालासोपारा आणि बोईसर हे मतदारसंघ हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी आमदार क्षितीज ठाकूर यांना प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पाठवलं होतं. मात्र सत्तापालट झालं असून राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाच्या महाविकासआघाडीचे सरकार आल्याने बहुजन विकास आघाडीनं महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बहुजन विकास आघाडीचे तीनही आमदार महाविकास आघाडीसोबत सत्तेत सहभागी होतील, अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना दिली.

महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. गुरुवारी, २८ नोव्हेंबरला मुंबईतील शिवतीर्थावर सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उद्धव यांना राज्यपाल मुख्यमंत्रिपदाची शपथ देणार आहेत. उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ७ दिवसांची म्हणजेच ३ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

‘फडणवीस पुन्हा गेले’ म्हणून हितेंद्र ठाकूर बविआ’च्या ३ आमदारांसह महाविकासआघाडीत