मुंबई : एखादा पक्षाध्यक्ष किंव्हा पक्षाचे मंत्री, आमदार किव्हा खासदारांसोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड करतात हे अनेकदा पाहिलं असेल. परंतु जेव्हा कार्यकर्ते उपस्थित पक्षाध्यक्ष, मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यापेक्षा फोटो किव्हा सेल्फी काढण्यासाठी पक्षाध्यक्षांच्या खासगी सचिवांना किंवा पी.ए. ला प्राधान्य देतात तेव्हा सध्याचं राजकारण कोणाला जवळ करावं हे चांगलच उमगल्याच चिन्ह असं समजावं.
काल गोरेगावच्या नेस्को संकुलात मंगळवारी शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन दिमाखात पार पडला. या शिबिरात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मनोहर जोशीं, पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार तसेच नगरसेवक उपस्थित असताना सुद्धा उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच आगमन होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी साहेबांच्या पी.ए. सोबत हस्तांदोलन आणि सेल्फी काढण्यासाठी एकच झुंबड उडाली.
नार्वेकरांनी सुद्धा त्यांना सेल्फी काढू दिले. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी, मंत्री आणि जेष्ठ नेत्यांमध्ये कुजबुज आणि स्मित हास्य पाहायला मिळालं. एकूणच नवीन आणि तरुण कार्यकर्त्यांना सध्याच राजकारण चांगलंच उमगलं असून, राजकारणात कोणाला महत्व द्यावं हे चांगलाच समजलं आहे असं एकूणच चित्र आहे.
