सांगली : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी मित्रपक्ष भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, भाजपामध्ये जनाधार असलेले नेते विकत घेतले जातात. सांगलीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना गजानन कीर्तिकर यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं.
पुढे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुद्धा चिमटा काढत खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, मंत्री महोदय चंद्रकांत पाटील तर थेट पैशाचा पाऊस पाडतात, त्यामुळे त्याची आर्थिक ताकद दिसते. परंतु ती ताकद तात्पुरत्या स्वरूपाची आहे आणि त्यामुळेच आता मोदींची घसरण सुरु आहे. भाजपची घसरण सुरु झाल्याने आता खरेदी केलेले नेते पुन्हा स्वगृही परततील अशी बोचरी टीका गजानन कीर्तिकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना केली.
सांगलीतील पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित केल्याने जिल्ह्यातील सर्वच नेते येथे उपस्थित होते. त्यावेळी गजानन कीर्तिकर यांनी सांगलीच्या उपस्थित जिल्हाप्रमुखांनाही सर्वांसमक्ष झापले. जिल्हाप्रमुखांना झापताना त्यांनी तालुका उपप्रमुख व बूथप्रमुख का नाहीत ? तुम्ही आम्हाला फसवता काय ? असा सवाल उपस्थित करत त्यांच्या नेमणुका रद्द करा अशा थेट सूचनाच जिल्हाप्रमुखांना देत त्यांनी उपस्थित स्थानिक नेत्यांना खडे बोल सुनावले.
