मुंबई : ईशान्य मुंबईमधून भाजपचा अधिकृत उमेदवार कोण हे अजून गुलदस्त्यात आहे आणि त्यात शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विद्यमान खासदार किरीट सोमैया यांना तीव्र विरोध असल्याने भाजपकडून मुलुंडमधील स्थानिक नगरसेवक मनोज कोटक यांचा देखील गांभीर्याने विचार केला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यात आधीच मुलुंड’मध्ये भाजपचे अनेक गट असल्याने किरीट सोमैया यांना अंतर्गत देखील विरोध असल्याचं समजतं.

लोकसभा निवडणूक आता अधिकृतपणे जाहीर झाल्या असल्यातरी मनोज कोटक यांनी मागील वर्षभरापासून थेट भांडुपपर्यंत स्वतःचा विस्तार करण्यास सुरुवात केली होती. त्यावरून त्यांना याची आधीच कल्पना असावी असंच म्हणावं लागेल. त्यात मनोज कोटक यांच्याकडे कार्यकर्त्यांचा संपर्क आणि धनशक्ती असे दोन्ही महत्वाचे विषय असल्याने त्यांचा विचार केला जात आहे. दरम्यान, असं असलं तरी सध्या मनोज कोटक हे न्यायालयीन प्रक्रियेत अडकले असल्याने त्यावर निकाल येण्यापूर्वीच भाजप हा धोका स्वीकारेल का, हा देखील विषय येतो.

या मतदारसंघात मुलुंड, घाटकोपर आणि भांडुप भागात मोठ्या प्रमाणावर गुजराती समाज असला तरी, मुलुंड, भांडुप, कांजूर, घाटकोपर, मानखुर्द या पट्यात मोठ्या प्रमाणावर मराठी आणि अल्पसंख्यांक समाज असल्याने त्याचा मोठा फायदा राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार संजय दीना पाटील यांना होऊ शकतो. त्यात भर म्हणजे भांडुप, विक्रोळी आणि कांजूर भागात मनसेचा मोठा प्रभाव असल्याने त्याचा मोठा फायदा संजय दीना पाटील यांना होण्याची शक्यता आहे. या मतदासंघातील मुस्लिम, ख्रिस्चन आणि इतर अल्पसंख्यांक समाज हा डोळेझाकुन राष्ट्रवादीच्या पारड्यात मतं टाकणार यात अजिबात शंख नाही. धनशक्ती आणि आक्रमक कार्यकर्त्यांची मोठी फळी ही संजय दीना पाटील यांच्याकडे देखील असल्याने ते त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतील यात शंका नाही. त्यांचा येथील आगरी कोळी समाजात मोठा प्रभाव आहे. त्यात या पट्यातील अनेक गुजराती हे काँग्रेस समर्थक देखील असल्याने भाजपसाठी हि जागा राखणे कठीण आहे.

त्यामुळे यासर्व परिस्थितीचा आढावा भाजपकडून घेण्यात येतो आहे. त्यात येथील स्थानिक मनसे कार्यकर्ते उघडपणे आणि शिवसैनिक छुप्यापद्धतीने राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यासाठी कामं करतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे भाजप सध्या कोणताही धोका उचलण्यास तयार नसल्याचे समजतं. मनोज कोटक यांना आयत्यावेळी जरी उमेदवारी जाहीर झाली तरी त्यांचा प्रभाव हे मुलुंड पुरताच मर्यादित आहे. परंतु याच पट्यातील भाजपच्या इतर आमदारांच्या जीवावर भाजप ही योजना आखात असल्याचे समजते.

Manoj Kotak name is in list instead of MP Kirit Somaiya in Mumbai Loksabha