मुंबई : सरकारमध्ये सामील होऊन भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना संधी मिळताच भाजपच्या सोबत पडद्याआड चर्चासत्र भरवते हे नित्याचे पाहायला मिळते. परंतु, शिवसेनेची सध्याची अवस्था पाहता ‘तुझं माझं जमेना, आणि तुझ्यावाचून करमेना’ अशी स्थिती झाली आहे. कारण स्वबळाचा नारा देणारे उद्धव ठाकरे नक्की काय करत आहेत हे शिवसैनिक सुद्धा सांगू शकत नाहीत. कारण उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आले आहे.

खासगी वृत्त वाहिनी एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, काल गोदावरी अर्बन बँकेच्या उद्घाटनानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांदरम्यान चर्चा झाली. शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बँकेच्या नरिमन पॉईंट येथील शाखेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या दरम्यान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते. परंतु, त्याच दरम्यान दोन्ही नेत्यांनी त्याच इमारतीत एका हॉटेलमध्ये जवळपास २० ते २० मिनिटे चर्चा केली. पण ती भेट कार्यक्रमाचे निम्मित दाखवून आधीच नियोजित केली होती असा अंदाज आहे. जर भेट कार्यक्रमात झाली होती तर पुन्हा हॉटेलमध्ये चर्चेचं कारण काय असा प्रश्न प्रसार माध्यमांना पडला आहे.

सध्या मराठा आरक्षण आणि दुष्काळामुळे सरकार अडचणीत आले आहे. त्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. त्यामुळे शिवसेनेचा भाजप विरोध हा केवळ निवडणुकीनिमित्त स्वतःला वेगळं भासविण्यासाठी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

meeting between shivsena chief uddhav thackeray and cm devendra fadnavis