सांगली : पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर त्या घटनेला संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हेच जवाबदार असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यातील मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई होऊन त्यांना अटक सुद्धा झाली आहे. परंतु संभाजी भिडे यांना सुद्धा अटक व्हावी म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत एल्गार मोर्चा सुद्धा काढला होता.
मुख्यमंत्र्यांनी कालच स्पष्ट केलं होत की, संभाजी भिडे यांच्या विरुद्ध एकही पुरावा सापडला नसल्याने त्यांना अटक करू शकत नाही. परंतु आता शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ राज्यभर त्यांच्या समर्थकांनी मोर्चे काढले आहेत, ज्याला प्रचंड समर्थन सुद्धा मिळत आहे. त्यात सांगलीत प्रचंड जनसमुदाय शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेला पाहावयाला मिळत आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ निघालेल्या या मोर्चाला ‘सन्मान मोर्चा’ असे आयोजकांनी नाव दिले आहे. राज्यातील विविध तालुक्यात आणि शहरात शिवप्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या ‘सन्मान मोर्चाला’ प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
परंतु शांतता भंग होऊ नये म्हणून पोलिसांनी संपूर्ण सांगली मध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
