मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या सामना मधील टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या मॅरेथॉन मुलाखतीत सर्वच प्रश्नांना त्यांच्या पक्षीय दृष्टीकोनातून उत्तर दिली आहेत, त्याला सर्वच थरातून उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे.
संजय राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक फोडण्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल होत. मागील वर्षी मुंबई महानगरपालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ६ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती. तसेच ही घटना मी कधीही विसरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यावेळी राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली होती.
मुलाखतीतील त्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की,’माझी पार्टी शिवसेनाप्रमुखांनी दुसऱ्याचा पक्ष फोडून स्थापन केलेली नाही. ती शिवसेना म्हणूनच स्थापन झाली आणि शिवसेना म्हणूनच आहे आणि ती शिवसेना म्हणूनच राहील. तिने तिचं कधीही नाव, नेता किंवा निशाण बदललं नाही आणि दुसरा पक्ष फोडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन नाही केला. मुळामध्ये जो पक्ष माझा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करूनच स्थापन झाला होता तो पक्ष फुटला म्हणजे नेमकं काय झालं? माझं म्हणणं हेच आहे की मुळातच माझं जे तुम्ही घेऊन गेला होतात ते माझ्याकडे परत आलं असेल तर मी कुठे काय फोडलं? विचार तोच, माणसं तीच, नवीन काय केलंत? निर्माण काय केलंत?’.
उद्धव ठाकरेच्या या मुलाखतीचा संदर्भ घेत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या ‘रिजनल आणि ओरिजनल पक्ष’ या विषयाला अनुसरून बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे यांना वास्तववादी उत्तर दिल आहे. बाळा नांदगावकर म्हणाले की,’लोकांना ‘ओरिजिनल’ आणि ‘रिजनल’ यांच्याशी काहीही देणेघेणे नसून, जो पक्ष लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर येऊन प्रश्न सोडवतो तोच त्यांना आपलासा वाटेल आणि भविष्यात मनसेच हाच लोकांचा पक्ष बनेल अशी प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली आहे.
