मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाचे स्वागत केले आहे. तसेच त्यांना सक्रिय राजकारणात आणण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे सुद्धा कौतुक केले आहे.
प्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे अगदी हुबेहूब रूप आहेत आणि त्यांच्या वागण्या तसेच बोलण्यात ती झलक सहज दिसते. त्यामुळे हिंदी भाषिक पट्टय़ात काँगेसला नक्कीच उभारी येईल. तसेच प्रियंकाची तोफ धडाडली आणि तिच्या सभांना प्रचंड गर्दी झाली तर हीच बाई इंदिरा गांधींप्रमाणे देशासाठी हुकमाची राणी ठरू शकेल असे गौरवोद्गार काढले आहेत.
तसेच राहुल गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ‘राफेल’ लढाऊ विमानांसारख्या विषयावर त्यांनी मोदी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. हे एकवेळ सोडा, पण ३ महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसने भारतीय जनता पक्षाकडून हातातील सत्ता खेचून घेतली आणि त्यामुळे मृतवत झालेलय काँग्रेसला संजीवनी मिळाली. त्याचे श्रेय त्यांना न देणे म्हणजे कोत्या वृत्तीचे लक्षण आहे. त्यामुळे सध्या राहुल गांधींनी उत्तम डाव टाकला आहे, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात राहुल गांधींचे कौतुक करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा भाजपच्या पोटात दुखण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
