पारोळ : वसई तालुक्यात दोन दिवसापासून पडणारा पाऊस, समुद्राची भरती, व तानसा धरणाचे पाणी या मुळे वसई पूर्व भागात पूरस्थिती निर्माण झाली असून तानसा नदीच्या काठावरील पारोळ, शिरवली, सायवन, उसगाव, चांदीप,घाटेघर, कोपर, नवसई, भाताणे, खानीवडे, खारट तारा, मांडवी, या गावात पुराचे पाणी आले असून, घरात पाणी जाऊन या भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शिरसाड अंबाडी मार्ग पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागाचा वसई, विरार, नालासोपारा शहराशी संपर्क तुटला आहे.
वसईत दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जोर धरला आहे. पावसाने शनिवारी जोरदार हजेरी लावल्याने दिवसभर वसईत धुमशान सुरू होते. दरम्यान, वसईतील नवघर- माणिकपूर शहरातील बहुतेक सखल भागासह रस्त्यावरही पाणी साचल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. आजही वसईत पावसाचा जोर कायम आहे.
पावसामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यासारख्या यंत्रणाही हायअलर्टवर आहेत. जिल्ह्यात पावसाचा जोर सुरु असल्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. याचसोबत सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती न पसरवण्याचं आव्हानही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे. आजही दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून आज हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कोलमडली असून रेल्वे रूळही पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूकही कोलमडली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.
