बंगळुरु: कर्नाटकच्या विधानसभा निवडणूका पार पडून केवळ ७ महिनेच झाले आहेत. परंतु, भारतीय जनता पक्षाचे पायउतार झालेले माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना अजून मुख्यमंत्री पदाचा मोह सोडवत नाही. केवळ ७ महिन्याच्या कालावधीत कर्नाटक भाजपानं २ वेळा काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मात्र दोन्ही वेळा ते प्रयत्न असफल ठरले.
परंतु, तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मात्र अजून प्रयत्न सोडलेले दिसत नाहीत. अजूनही त्यांना मुख्यमंत्री होण्याची मोठी संधी चालून आल्याची स्वप्नं पडत आहेत, असंच म्हणावं लागेल. यामागे सर्व घडामोडींमागे येडियुरप्पा यांचे ज्योतिष असल्याची माहिती आता प्रसार माध्यमांच्या समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची शक्यता आहे.
कारण सुद्धा तसंच आहे आणि ते म्हणजे येडियुरप्पा यांचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास आहे. १५ जानेवारीनंतरचं तुमचं ग्रहमान अनुकूल असेल, असं केरळच्या एका ज्योतिषानं येडियुरप्पांना सांगितल्याचं वृत्त आहे. तुमचं ग्रहमान चांगलं असल्यानं हमखास यश आणि सत्ता मिळेल, असं भाकीत ज्योतिषानं वर्तवल्यानं येडियुरप्पा सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा कार्यरत झाल्याचे वृत्त आहे.त्यासाठी त्यांनी पुन्हा काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे वृत्त आहे. सदर विषयात स्वतः काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता पक्षातील आमदारांसह भारतीय जनता पक्षाला मदत करत असल्याचं वृत्त नवभारत टाईम्सनं दिलं आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		