मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी गरीबी हटावची घोषणा करताहेत. खरंतर याआधी त्यांच्या आजीबाईंनी याची सुरूवात केली होती. त्यांची गरीबी हटली, परंतु लोकांची नाही. काँग्रेस देशद्रोहाचे कलम हटवू पाहत आहे. हाच सर्वात मोठा देशद्रोह आहे. हे कलम काढल्यास दाऊद येऊन काँग्रेसचा नेता बनेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी महालक्ष्मी रेसकोर्सजवळ आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशद्रोह्यांना गोंजारणारे, क्रांतीकारकांना कायर म्हणणाऱ्यांच्या हाती देश देऊ नका. मी अमित शहांचा अर्ज भरायला गेलो, तर माझ्यावर टीका झाली. एनसीपीवाले म्हणतात, तुम्ही यांच्या शामियानात कसे? त्यांच्या पोटात का दुखतय? अरे याच तंबूत तुम्ही आधी झाडलोट करायला गेला होता, असा सवालही त्यांनी केला.
मिलिंद आमच्या अंगावर येताना जरा जपून ये. तुझ्या वडिलांना ओळख माझ्या वडिलांनी दिली. बाळासाहेबांनी मुरली देवरा यांना महापौर केले नसते, तर आज मुंबईकरांना ते कोण? हे कदाचीत माहित नसते, अशी टीका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मराठवाड्यातील जुलमी निजामाची राजवट संपविण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल खंबीरपणे पाठिशी राहिले. तसे इथल्या जनतेला आणि महाराष्ट्रातील सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन उद्घव ठाकरे यांनी केले. लातूर-उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारसभेत पहिल्यांदाच औसा येथे मंगळवारी एकत्र आले. ठाकरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने केलेला जाहीरनामा वाचून आनंद झाला. कलम ३७०, राममंदिर आणि शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे. युती होण्याचे हेच कारण आहे. काँग्रेसचा जाहीरनामा मात्र थापा आहेत. राहुल यांच्या आजींपासून गरिबी हटावचा नारा सुरु आहे. त्यांची गरिबी हटली मात्र लोकांचे काय
झाले, अशी टीका ठाकरे यांनी केली.
