सातारा : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावा द्या, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आव्हान दिले होते. त्यामुळे उदयनराजेंचे समर्थक संतप्त झाले.
साताऱ्यात बाजारपेठ आणि ठिकठिकाणची दुकानं बंद ठेवण्यात आल्याने सकाळपासूनच साताऱ्यातील व्यवहार ठप्प झाले. उदयनराजेंच्या समर्थकांनी राजवाड्यातील गांधी मैदान ते साताऱ्यातील पोवई नाका असा मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
तर उदयनराजेंसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत दोन गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पाट्या टांगून निषेध व्यक्त करण्यात आला. सातारच्या बाजारपेठेतल्या नेहमीच्या गजबलेल्या ठिकाणी आज शांतता पाहायला मिळाली. सोलापूर, सांगली आणि नगरमध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले आहे. साताऱ्यात पोवई नाका चौकात गाढवांची धिंड काढून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या पाट्या टाकून उदयनराजे समर्थकांचे निषेध आंदोलन सुरू आहे.
Web Title: Satara closed announced by Chhatrapati Udayanraje Bhonsale Supporters after Shivsena MP Sanjay Raut comment.
