अहमदनगर : स्थानिक महापालिका निवडणुकीसाठी आयत्यावेळी केडगावचे काँग्रेसचे तब्बल ५ उमेदवारांना भाजपात प्रवेश देऊन निवडणुकीत आघाडीवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला निवडणुकीआधीच मोठी चपराक मिळाली आहे. करण भाजपचे तब्बल ४ महत्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यात धक्कादायक म्हणजे यात स्वतः भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान खासदार दिलीप गांधी याचे पुत्र सुवेद्र गांधी तसेच त्यांच्या स्नुषा दीप्ती सुवेद्र गांधी यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.

तसेच शिवसेनेचे तगडे उमेदवार आणि नगर महापालिकेतील विद्यमान विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांचा अर्ज सुद्धा छाननीत बाद झाल्याने सलग ६ वेळा नगरसेवक पद भूषविणारे बोराटे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर फेकले गेले आहेत. बाद करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये एनसीपीचे उमेदवार योगेश चिपाडे यांचा सुद्धा समावेश आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे यांनी शुक्रवारी सकाळी २.३० वाजता हा निकाल जाहीर केला. विशेष म्हणजे एवढ्या रात्री निकाल देण्याची घटना महापालिका निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे महापालिकेतील विद्यमान विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी प्रभाग क्रमांक १२ मधून अर्ज दाखल केला होता. संजय घुले यांनी त्यांच्या विरूद्ध आक्षेप अर्ज नोंदवला होता. त्यांचा मालमत्ता कराची थकबाकी आणि मोबाईल टावरच्या कराची थकबाकी, असा त्यांच्या अर्जावर आक्षेप होता आणि तो सार्थ ठरला.

ahmednagar municipal corporation election 4 bjp candidates and shivsenas 1 application cancelled by election commission