नागपूर : सध्या भाजप कार्यकर्त्यांचं वर्तन आणि चारित्र्य अटलजींसारखं आहे का? असा रोखठोक सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजप कार्यकर्त्यांना केला. पक्षाच्या कार्यक्रमात मला फक्त चहाच दिला-बिस्किट दिले नाही अशा मुद्द्यांवर पक्षात खडाजंगी होते, असा सणसणीत टोला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना लगावत सत्य परिस्थितीवर बोट ठेवलं.

सध्या भाजपमधील कार्यकर्ते पक्षापेक्षा स्वतःपुरताच विचार करताना दिसत असून कोणत्याही छोट्या मुद्यावर वाद निर्माण करतात. माझं नाव निमंत्रण पत्रिकेवर का नाही छापलं? एक पातळ हार घालून माझं स्वागत का केलं? माझ्या स्वागताला कार्यकर्ते का नाही आले? माझा सन्मान का नाही करण्यात आला? आणि कार्यक्रमात मला केवळ चहाच दिला पण बिस्कीट नाही दिल? असा शुल्लक कारणांवरून कार्यकर्ते पक्षात भांडताना दिसतात, असं सांगत कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीचे वाभाडे काढले.

आपल्या पक्षाचे आमदार इतक्या संकुचित मनाचे आहेत की त्या अमुक अमुक कार्यकर्त्याला मंचावर घेऊ नका आणि त्याला पक्षात सुद्धा घेऊ नका असे निष्क्रिय विषय पुढे रेटून वाद निर्माण करत असतात. परंतु आपण इतक्या संकुचित मनाने अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांप्रमाणे कसे काय चालू शकतो? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित कार्यकर्ते तसेच नेत्यांना केला.

स्वर्गीय. अटलजींचे वर्तन आणि चारित्र्य जसे खरोखर आणि प्रामाणिक होते, तसे आपण खरोखर आहोत का याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे असं सांगत उपस्थित कार्यकर्त्यांच्या वर्तनाची काणघडणी केली. भाजपच्या पार्लमेंट्री बोर्डात असताना त्यांनी कधीच स्वतःच्या जवळील तसेच नात्यातील लोकांसाठी किंवा व्यक्तींसाठी पदाची मागणी केली नाही. अनेक निर्णय त्याच्या विरोधात होऊन सुद्धा त्यांनी केव्हाही त्याला विरोध केला नाही. अटलजी त्यांच्या विचारातूनच लोकशाहीचे पुरस्कर्ते होते असं गडकरी म्हणाले.

Central minister Nitin Gadkari criticised BJP Leaders and workers over behaviour in the party