मुंबई : भारतीय जनता पक्ष जर आज महाराष्ट्रात पाय घट्ट करू शकला असेल ते तो शिवसेनेमुळे. राज्यात फारसं अस्तित्व नसलेला भाजप त्यावेळी शिवसेनेसोबत युती करून राज्यभर पक्ष विस्तार केला. त्यानंतर २०१४ मध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मात्र भाजप उन्मत्त झाली आणि स्वतःच्या मित्रपक्षांच्या अडचणीत वाढ करून, त्यांच्याच अस्तित्वाला आवाहन देण्याचा हेतुपुरस्कर प्रयत्न केला. त्यात भर म्हणजे राज्याची राजधानी असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश प्राप्त केलं. त्यामुळे भविष्यात भाजप शिवसेनेचा आर्थिक लचकाच मोडेल अशी शक्यता आहे.
मागील चार साडेचार वर्षात शिवसेनेना प्रमुखापासून ते सेनेचे मंत्री, आमदार आणि खासदारांना नेहमीच अपमानास्पद आणि दुय्यम वागणूक दिली गेली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका जवळ येताच आणि ५ राज्यांमध्ये झटका बसताच भाजपचे प्रेम पुन्हा ऊतू आले आहे. त्यासाठी भविष्याचा विचार करून एकदम नमतं घेत भाजपचे पक्षश्रेष्ठी थेट मातोश्रीवर अवतरले. त्याचवेळी भाजपमधील स्वार्थी आणि व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणारी नेते मंडळी शिवसेनेने ध्यानात घेणे गरजेचे होते. तरीसुद्धा छुप्या मार्गाने का होईना, युतीसाठी हालचाली सुरूच आहेत.
अगदी कोकणात अस्तित्व नसताना देखील भाजपने नारायण राणे यांना जवळ करत स्वतःसाठी कोकणात जोडीदार शोधून सेनेवर कुरघोडीच केली आहे. त्यामुळे तिथे देखील शिवसेनेला संपवण्याच्या योजना सुरु आहेत. भाजपचे राज्यातील एकूण राजकारण आणि पक्षविस्तार पाहिल्यास ते सर्वाधिक शिवसेनेसाठी घातक असल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येईल. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला नशिबाने पुन्हा यश मिळाल्यास सर्वात अधिक धक्के हे शिवसेनेलाच दिले जातील अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. देशाच्या राजकारणात महाराष्ट्रासारखं राज्य स्वतःसाठी होमपीच बनवणं हे भाजपचं मुख्य ध्येय असून, इथलं आर्थिक राजकारण देखील मुठीत कसं ठेवता येईल, यासाठी फार आधीपासून हालचाली आहे. कारण, मुख्यमंत्री जरी महाराष्ट्रातील असला तरी त्याचा रिमोट हा पूर्णपणे गुजरातकडे असेल यात काही वाद नाही. त्यात सध्या मोदींना महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या गोष्टी गुजरातमध्ये वर्ग करण्याची घाई लपून राहिलेली नाही. बुलेटट्रेन हा त्यातलाच प्रकार आणि असं सर्व असताना शिवसेनेला कमजोर करणे हे भाजपसाठी क्रमप्राप्त होते. त्यामुळे शिवसेना पक्षाचा भविष्यातील विचार करता उद्धव ठाकरे युतीबाबत नेमका कोणता निर्णय घेणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		