मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयत्यावेळी पक्ष प्रवेश सुरु झाले आहेत. भाजपाकडे आजही निवडून येण्यासाठी इतर पक्षांतील उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेत्यांना गळाला लावण्याचा सपाटा भारतीय जनता पक्षाने लावला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

‘ज्यांना आम्ही नाकारलं, त्यांना का गोंजारता?’ असा सवाल राष्ट्रवादीनं पोस्टरमधून विचारला आहे. या पोस्टरवर कुठेही भाजपाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. परंतु मागील काही दिवसात घडलेल्या घडामोडी लक्षात घेतल्यास हे पोस्टर कोणासाठी लावण्यात आलं आहे, हे ओळखणं फारसं अवघड नाही.

माढ्यातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. रणजितसिंह यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील माढ्याचे खासदार आहेत. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानं रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना हाती कमळ घेतलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीनं भाजपावर पोस्टरमधून निशाणा साधला. ‘दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार? स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार?’, असे प्रश्न राष्ट्रवादीनं उपस्थित केले आहेत. मुंबईतल्या विविध भागांमध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सध्या या पोस्टर्सची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Mumbai NCP party attacks bjp through poster after ranjitsingh mohite patil sujay vikhe patil joins saffron party