जयपूर : राजस्थानमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जोरदार घडामोडी घडताना दिसते आहेत. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कॅबिनेटमधील तब्बल चार मंत्र्यांसह भाजपच्या स्थानिक ११ जेष्ठ नेत्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरूद्ध निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने राजस्थान भाजपकडून त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या सर्व ११ जणांना सहा वर्षांपर्यंत पक्षाच्या प्राथमिक सदस्य यादीतून सुद्धा हटविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
सुरेंद्र गोयल, लक्ष्मीनारायण दबे, राधेश्याम गंगानगर, हेमसिंग भडाना, राजकुमार रिणवां, रामेश्वर भाटी, कुलदीप धनकड, दीनदयाल कुमावत, किशनाराम नाई, धनसिंह रावत आणि अनिता कटारा या ज्येष्ठ नेत्यांचे भारतीय जनता पक्षातून पुढील ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षातर्फे अधिकृत तिकीट न मिळाल्याने आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय जाहीर केल्याने अखेर भाजपाकडून ही तडकाफडकी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
