मुंबई : आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य काँग्रेसमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आला आहे. मुंबई सर्व वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे यांची आज भेट घेतली आहे.
या भेटीदरम्यान कॉंग्रेस नेत्यांनी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ‘संजय निरूपम हटाओ’ अशी थेट मागणी या नेत्यांनी उचलून धरली आहे. स्थानिक नेत्यांचा आक्रमकपणा पाहून याविषयी जानेवारी महिन्यात अंतिम निर्णय घेऊ असे पक्षश्रेष्ठींनी आश्वासन दिले आहे.
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीआधी विद्यमान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना हटवून त्यांच्या जागी मिलिंद देवरांना यांना मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष बनवण्याची मागणी कॉंग्रेसमध्ये पुढे आली आहे. त्यामुळे संजय निरुपम यांची गच्छन्ति होण्याची दाट शक्यता आहे.
