मुंबई: स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल (Rafael Nadal)याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत ‘अमेरिकन ओपन’ (US Open २०१९) स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात नदालने रशियाच्या दानिल मेदवेदेवला पराभूत केलं. जवळपास पाच तास चाललेल्या या सामन्यात नदालने मेदवेदेवचा ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला.

अंतिम सामन्यात विजयासाठी राफेल नदालला पहिलंच ग्रँड स्लॅम खेळत असलेल्या मेदवेदेवने चांगलाच संघर्ष करायला लावला. मात्र नदालने आपल्या अनुभवाचा फायदा घेत प्रतिस्पर्धाला धूळ चारली. यंदाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेमध्ये महिला गटात कॅनडाच्या १९ वर्षीय युवा टेनिसपटू बियांका आंद्रिस्कू हिने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम उंचावताना दिग्गज सेरेनला धक्का देण्याचा पराक्रम केला.

२३ ग्रँडस्लॅम वेजेतेपद पटकावलेल्या सेरेनाला संभाव्य विजेती मानले जात होते. किंबहुना तिचे २४वे जेतेपद जवळपास निश्चित मानले गेले होते, मात्र आंद्रिस्कूने दिग्गज सेरेनाच्या तगड्या आव्हानाचे कोणतेही दडपण न घेताना ६-३, ७-५ असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत बाजी मारली. यासह आंद्रिस्कू गेल्या १५ वर्षांतील सर्वात युवा खेळाडू ठरली. याआधी रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोवाने वयाच्या १९व्या वर्षीच यूएस ओपनचे जेतेपद पटकावले होते. सेरेनाचे विश्वविक्रमावला गवसणी घालण्याचे स्वप्न भंगले.

पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात राफेल नदाल आणि डॅनिल मेदवेदेवचा यांच्यातील लढतीचा थरार पाच तास चालला. तब्बल पाच फेऱ्यानंतर नदालने मेदवेदेवचा ७-५,६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला. नदालने २७व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर आतापर्यंत १८ ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत. हे नदालचे १९वे ग्रँडस्लॅम आहे. यापूर्वी नदालने २०१०, २०१३ आणि २०१७ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल US ओपनचा चॅम्पियन