वैभववाडी : विधानसभेसाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने अनेकांची उमेदवारी नाकारून आयारामांना संधी दिली आहे. यामुळे अनेक मतदारसंघामध्ये नेत्यांनी बंड पुकारलं होतं. मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर प्रचाराची धुरा देत बंड थंड केलं आहे. भारतीय जनता पक्षाने एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचा पत्ता कट केला आहे.

पक्षाने तिकीट नाकारूनही विनोद तावडे मोठ्या उदार अंतकरणाने भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला लागलेत खरे पण अजूनही ते आपलं तिकीट का कापलं असावं याचीच उत्तरं शोधत फिरताना दिसत आहेत. सिंधुदुर्गात नितेश राणेंच्या प्रचारासाठी आल्यानंतरही विनोद तावडेंनी ही खंत पुन्हा बोलून दाखवली. वैभववाडी तालुका म्हणजे विनोद तावडेंच्या मामाचं गाव. याच गावात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी विनोद तावडे आणि प्रवीण दरेकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते दाखल झाले आणि त्यांनी नितेश राणेना भरघोस मतानी निवडून द्यावं असं आवाहन केलं.

पण तावडे हे देखील सिंधुदुर्गाचेच सुपुत्र असल्यामुळे खुद्द त्यांनाच भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारल्याची खंत भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यानी बोलून दाखवली. कदाचित हीच खंत विनोद तावडेनाही असल्यामुळे ते अजूनही आपलं तिकीट का कापलं याचं उत्तर शोधत फिरत आहेत. त्यासाठी आपण बोरीवलीत कशी माणसं जोडली याचीही भन्नाट उदाहरणं संधी मिळेल तिथं सांगत सुटत आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हा पुन्हा भारतीय जनता पक्षाचा असेल. भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी आणि कोकणच्या विकासासाठी कणकवली देवगड-वैभववाडीचा आमदार भारतीय जनता पक्षाचाच हवा. यासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन ना. विनोद तावडे यांनी बुधवारी केले. बाळासाहेब ठाकरे यांना अडचणीच्या काळात असंख्य शिवसैनिकांनी साथ दिली. त्यांच्या रक्षणासाठी मेहनत घेतली. त्यातीलच नारायण राणे हे एक शिवसैनिक होते. हे देखील आताच्या बाळासाहेब ठाकरे प्रेमींनी विसरता कामा नये, असे तावडे यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ वैभववाडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने एडगाव येथील सुमित्रा मंगल कार्यालयात विजयी संकल्प मेळावा झाला. यावेळी व्यासपीठावर तावडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आ. अजित गोगटे आदी उपस्थित होते.

तावडे म्हणाले, आम्ही भारतीय जनता पक्षाचे, संघाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत. तिकीट नाही मिळाले म्हणून नाराज नाही. ही निवडणूक नितेश राणे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांचीही नाही, तर ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, हे सर्वानी लक्षात ठेवले पाहिजे. अमेरिकेच्या मदतीला आपले पंतप्रधान मोदी जातात. हाच मोठा तमाम भारतीयांचा सन्मान आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने प्रचाराची बांधणी भक्कम करा. मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यांने घराघरात जाऊन कमळ चिन्हाचा प्रचार केला पाहिजे. प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे, असेही सांगितले.

भाजपने माझं तिकीट का कापलं तेच कळत नाही? तावडेंच्या प्रचारात सुद्धा तोच मुद्दा